DAILY EDUCATION

Tuesday, August 16, 2022

इयत्ता चौथी - वाक्प्रचार


 



वाक्प्रचार - अर्थ व वाक्यात उपयोग 

२. बोलणारी नदी

•हौस असणे - आवड असणे. 

वाक्यात उपयोग - सीमाला सुंदर सुंदर फुलपाखरांची कात्रणे जमविण्याची खूप हौस आहे.


•परवानगी मिळणे - अनुमती मिळणेे. 

वाक्यात उपयोग - शारदाने सहलीला जाण्यासाठी आई-वडिलांकडून परवानगी मिळवली.


•शाळा बुडवणे - शाळेत न जाणे 

वाक्यात उपयोग - गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे कबीरच्या मनात शाळा बुडविण्याचा विचार आला.


•खुश होणे - आनंदी वाटणे. 

वाक्यात उपयोग - आईने गावाला सोबत नेल्यामुळे मीरा खुश झाली.


•नवल वाटणे - आश्चर्य वाटणे 

वाक्यात उपयोग - गृहपाठ पूर्ण करण्याचा कंटाळा करणाऱ्या समीरने आज गृहपाठ पूर्ण केलेला पाहून सर्वांनाच नवल वाटले.


५. मला शिकायचंय !

•चिंतेत पडणे - विचारात पडणे.

वाक्यात उपयोग - सदा भाऊला मुलीचा विवाह, मुलाचे शिक्षण करायचे होते पण गरिबी परिस्थितीमुळे ते चिंतेत पडले.


•गहिवरून येणे - हृदय भरून येणे 

वाक्यात उपयोग - अत्यंत गरिबी परिस्थितीत शिक्षण घेऊन आपली मुलगी कलेक्टर झाली हे सांगताना सखारामला गहिवरून आले.


•डोळे पाणावणे - डोळ्यात अश्रू येणे 

वाक्यात उपयोग सिंधुताई सपकाळ यांची दुःखी कहाणी ऐकून सर्वांचे डोळे पाणावले.


•अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे 

वाक्यात उपयोग अचानक मामा घरी आल्याने मला अचंबा वाटला.


•पोटतिडकीने बोलणे - कळकळीने बोलणे 

वाक्यात उपयोग - मी अपराध केला नाही असे निर्दोष मनुष्य पोट तिडकीने सांगत होता.


•रक्ताचे पाणी करणे - खूप कष्ट करणे 

वाक्यात उपयोग - पतीच्या मृत्यूनंतर राहीबाईंनी रक्ताचे पाणी करून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण केले.

 

६. मायेची पाखर 

•टाळाटाळ करणे -एखादी गोष्ट करायचे टाळणे

वाक्यात उपयोग - राहुलला काम सांगितले की तो सतत टाळाटाळ करत असतो.


•पोटात कावळे - ओरडणे खूप भूक लागणे.

वाक्यात उपयोग - सहलीमध्ये सतत चार तास फिरून झाल्यावर मुलांच्या पोटात कावळे ओरडू लागले.


• डोळा लागणे - झोप लागणे.

 वाक्यात उपयोग - दिवसभराच्या मजुरीचे काम केल्यावर रामुचा रात्री पटकन डोळा लागत असे.


• पोटाशी धरणे - मायेने जवळ घेणे 

वाक्यात उपयोग - वसतिगृहात शिकत असलेला मुलगा सुट्टीत घरी आल्यानंतर आईने त्याला पोटाशी धरले.


•झटत राहणे - सतत प्रयत्न करणे.

वाक्यात उपयोग - दिन दलितांच्या उद्धारासाठी डॉ. आंबेडकर सतत झटत राहिले.


८. गुणग्राहक राजा

•देहभान विसरणे - स्वतःची जाणीव विसरणे.

वाक्यात उपयोग - क्रिकेटचा सामना बघतांना राहुल आपले देहभान विसरला होता.

 

•पाठलाग करणे - पिच्छा करणे 

वाक्यात उपयोग - पोलिसांनी चोरांचा पाठलाग सुरू केला.


•भानावर येणे - शुद्धीवर येणे.

वाक्यात उपयोग - रविवारची सुट्टी असल्यामुळे दिवसभर चित्र काढण्यात गुंग असणारा परी आईने आवाज दिल्यावर भानावर आली.

 

•वार्ता पसरणे - बातमी पसरणे   

वाक्यात उपयोग - बिबट्या गावात आला ही वार्ता सगळीकडे पसरली.


९. ईदगाह 

•आनंद उतू जाणे - खूप आनंद होणे. 

वाक्यात उपयोग - उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच मामा गावाला घेऊन जाणार हे ऐकून कविताचा आनंद उतू जात होता.

 

•धुडकावून लावणे - पळवून लावणे.

वाक्यात उपयोग - जेवणासाठी पैसे मागणाऱ्या भिकाऱ्याला एका कंजूष व्यापाऱ्याने धुडकावून लावले.


•मनावर ताबा मिळविणे - संयम ठेवणे

वाक्यात उपयोग - दिवाळीत प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके न उडवण्यासाठी साकेतने मनावर ताबा ठेवला.

 

१०.धाडसी हाली

•हिम्मत दाखवणे - धाडस दाखवणे

वाक्यात उपयोग - किरणने पुरात वाहून जात असलेल्या आपल्याला मित्राला वाचवण्याची हिंमत दाखवली.


• खडा न् खडा माहित असणे - अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती असणे.

वाक्यात उपयोग - शिवाजी महाराजांचे हेर शत्रूच्या गोटात जाऊन खडा न् खडा माहिती मिळवत असत.


• झुंज देणे - लढा देणे

वाक्यात उपयोग - गरीब लोकांना परिस्थितीशी झुंज देत जगावे लागते.


• मदत करणे - सहाय्यता करणे.

 वाक्यात उपयोग - घरची परिस्थिती गरीब पण अत्यंत हुशार असलेल्या पवनला गुरुजी शिक्षणात मदत करत होते.


१२. वाटाड्या 

•गलबलून येणे - मन भरून येणे 

वाक्यात उपयोग - सासरी जाणाऱ्या मुलीला पाहून वडिलांचे गलबलून येत होते.


•चाहूल लागणे - कोणीतरी येण्याची जाणीव होणे.

वाक्यात उपयोग - रात्री दोनच्या सुमारास घरात चोर घुसला आहे याची शामरावांना चाहूल लागली.

 

•भीती वाटणे - घाबरणे.

वाक्यात उपयोग - सापाची सर्वांनाच खूप भीती वाटते.

 

•टिंगल करणे - मजा घेणे. 

वाक्यात उपयोग - शामला सर्वांची टिंगल करण्याची वाईट सवय आहे.


•जीव घाबरणे - बेचैन होणे 

वाक्यात उपयोग -परीक्षा जवळ आली की मुलांचा जीव घाबरतो.

 

•छाती धडधडणे - खूप भीती वाटणे.

वाक्यात उपयोग - समोरचा भला मोठा अजगर पाहून  सदानंदची छाती धडधडायला लागली.


१३. चवदार तळ्याचे पाणी 

•प्रेरित करणे - प्रेरणा देणे, स्फूर्ती देणे 

वाक्यात उपयोग - डॉ. आंबेडकरांचे कार्य हे स्फूर्ती देणारे आहे.


१४.मिठाचा शोध

• कुतूहल वाटणे - नवल वाटणे

वाक्यात उपयोग - आज रात्री आजी कोणती गोष्ट सांगणार याचे मुलांना कुतूहल वाटत होते.


•अंगाला झोंबणे - शरीराची आग होणे

वाक्यात उपयोग - अंगभर जगलेल्या जखमा मुळे समुद्राचे खारे पाणी अंगाला झोंबते.


•निरीक्षण करणे - बारकाईने पाहणे . 

वाक्यात उपयोग - सर्कसीतल्या विदूषकाने केलेल्या प्रात्यक्षिकाची सर्व मुले निरीक्षण करू लागली.


१५.आनंदाचं झाड 

• रुंजी घालणे - भोवती फिरणे.

वाक्यात उपयोग - भूक लागली की आमचा मोती कुत्रा माझ्या भोवती रुंजी घालतो.


• परोपकार करणे - दुसऱ्यांसाठी चांगले काम करणे. 

वाक्यात उपयोग - समाजसुधारकांची, साधुसंतांची वृत्ती परोपकाराची असते.


•फन्ना उडवणे - खाऊन टाकणे 

वाक्यात उपयोग - बाहेर वाळत घातलेल्या दाण्यांचा कबुतरांनी फन्ना उडवला.


•आधार देणे - सांभाळणे, सावरणे

वाक्यात उपयोग - उंचावर चढलेल्या वेलींना मोठे झाड आधार देण्याचे काम करतात.


•साद घालणे - हाक देणे.

वाक्यात उपयोग - शेतात काम करीत असलेल्या पतीला जेवणासाठी रखमाबाईने साद घातली.


•निगा राखणे - काळजी घेणे 

वाक्यात उपयोग - आजारी असलेल्या मित्राची शाम रात्रंदिवस निगा राखत होता.


•उठून दिसणे - शोभून दिसणे 

वाक्यात उपयोग - काल दिवसभर मुलांनी वर्ग सजावट केल्यामुळे आमचा वर्ग उठून दिसत होता.

 

• पाळत ठेवणे - लक्ष ठेवणे.

वाक्यात उपयोग - बिळात दडलेल्या उंदरावर मांजर पाळत ठेवून होते.


• सुळकी मारणे - गोलाकार फिरून पळून जाणे.

वाक्यात उपयोग - पाण्यातल्या माश्याने एक सुंदर सुळके मारली आणि तो अदृश्य झाला.


१६.झुळूक मी व्हावे 

• पसार होणे - पळून जाणे 

वाक्यात उपयोग - मांजरीला पाहून उंदीर पसार झाला.

  

• कानोसा घेणे - अंदाज घेणे 

वाक्यात उपयोग - घरात कोणी आहे का याचा चोरांनी कानोसा घेतला.

 

•भरारी घेणे - उंच झेप घेणे 

वाक्यात उपयोग - पक्ष्याने आकाशात उंच भरारी घेतली.

 

१८. जननायक बिरसा मुंडा 

•संकल्प करणे - निश्चय करणे

वाक्यात उपयोग - मी रोज पाच सुविचार पाठ करण्याचा संकल्प केला.

 

•लढा पुकारणे - संघर्ष करणे.

वाक्यात उपयोग - कारखान्यात कामगारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सर्व संघटनांनी लढा पुकारला.


•जेरीस आणणे - त्रासवून टाकणे 

वाक्यात उपयोग - बिरसा मुंडा या आदिवासी जननायकाने इंग्रजांना जेरीस आणले.


 •टिकाव न लागणे - हार होणे, न टिकणे

वाक्यात उपयोग - बुद्धिबळाच्या स्पर्धेत विश्वनाथ आनंद समोर कोणाचाही टिकाव लागत नाही.

 

•संघटित करणे - एकत्रित करणे 

वाक्यात उपयोग - सर्वांना संघटित करून कार्य केले तरच ते कार्य यशस्वी होते.


•बंड करणे विद्रोह करणे 

वाक्यात उपयोग स्वातंत्र्यसंग्रामात लोकांनी इंग्रजांच्या जुलमी, अन्यायी राजवटीविरुद्ध विरुद्ध बंड केले.


•वीरगती प्राप्त होणे देशासाठी लढताना मरण येणे.

वाक्यात उपयोग कारगिल युद्धात अनेक  सैनिकांना वीरगती प्राप्त झाली.


• रस असणे - आवड असणे 

वाक्यात उपयोग - समीक्षाला संगीत व नृत्यात विशेष रस होता.


•असंतोष निर्माण होणे - चिड निर्माण होणे  

वाक्यात उपयोग - इंग्रजांच्या जुलमी राजवटीमुळे सर्व जनतेत असंतोष निर्माण झाला.


•कारावास ठोठावणे- तुरुंगवासाला पाठवणे  

वाक्यात उपयोग - इंग्रजांनी टिळकांना सहा वर्षाचा तुरुंगावास ठोठावला.



No comments:

Post a Comment